Thursday, 14 May 2020

Lonavala to Khandas via Bhimashankar SOLO in 12 Hrs 16 Mins


लोभी शब्द कानावर पडता लगेच स्वार्थी माणूस नजरेसमोर येतो पण आम्हा भटक्यांसाठी लोभी म्हणजे " लोणावळा ते भीमाशंकर "

एखाद्या गोष्टीचा लोभ करणे म्हणजे काय, जर का माहित नसेल तर तुम्ही लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक नक्की करून बघा ते पण फक्त भाद्रपद ( सप्टेंबर ) महिन्यात. माझी गिर्यारोहणाची सुरवात २०११ वर्ष्यापासुन झाली आणि पाहिल्यावर्षीच हा ट्रेक करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आल. २०११ या एका वर्षात खूप ठिकाणी भटकंती झाली पण राहून राहून लोभीची आठवण काही जाता जात नव्हती शेवटी पुन्हा एकदा लोभी ट्रेक करायचा ठरवलं. 


२०११ पासून जे काही ट्रेक केले त्यामध्ये एक गोष्ट पक्की झाली ती म्हणजे ट्रेकला ७ ते ८ जणांची टोळी म्हणजे एकदम मस्त combination होत. २०१२ मध्ये काही मित्रांना ट्रेकचे निमंत्रण देखील दिले होते पण मराठीत एक म्हण आहे "नकटीच्या लग्नाला १७६० विघ्ने" अगदी तसंच काहीतरी चालू होत. एकामागोमाग एक करत सर्वच मला टांग देऊन गेले, मी तर आत्ता जणू काही निर्धारच केल्यासारखा वागत होतो. कदाचित नियतीला देखील मी सर्वांबरोबर जाणे मान्य नसेल, पण माझा ट्रेक अगदी सुरळीतपणे पार पडला. पहिल्यादा एकट्याने लांब पल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला होता. त्यानंतर बऱ्याच वेळा मित्रानंबरोबर लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक केला. 

२०१६ मध्ये अरुण सर देखील लोभी ट्रेकला आले. तेव्हा आमचं लोभी एकदिवसीय मोहिमेवर बोलणं झाले. ३१ डिसेंबर २०१७ रोजी अरुण सर त्याच्या ऑफिसमधून निवृत्त झाले आणि लगेच १ ते २ दिवसात लोभी एकदिवसीय मोहिमेचे बिगुल वाजवून तारिख ठरवली. सरांचा एकाच गोष्टीवर सर्वात जास्त जोर होता ते म्हणजे पूर्णपणे सराव करून कोणतीही गोष्ट केली तरच तुम्ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी मोहीम करायचा निर्धार पक्का झाला. सरावासाठी ५० दिवस हे तसे पुरेसे होते पण काही दिवसाच्या तयारी नंतर सर्वजण आपापला अनुभव ग्रुपवर मांडत होते त्यामध्ये सरांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आम्हा सर्व नवीन मंडळींना झाला. 

२४ फेब्रुवारी २०१८ च्या रात्री  ठीक १ वाजता ISOLATION ZONE च्या २६ मावळ्यांनी लोणावळा रेल्वे स्टेशनच्या इंडिकेटर खालून या TRAIL RUN ला सुरवात केली. आम्ही २६ जण एकूण तीन ग्रुप मध्ये विभागले गेलो होतो. पहिल्या तुकडीची जबाबदारी अरुण सरांनी माझ्या अंगावर सोपिवली होती. दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व संजय शेळके तर तिसऱ्या तुकडीचे  नेतृत्व आमचा Back Lead Expert सागर अमराळेकडे होती. 


सकाळी ७ च्या सुमारास सर्व टीम कुसूर गावात पोहोचून कोस्लो सॅन्डविच खाऊन पुढचा टप्पा तळपेवाडी गाठण्यासाठी तयार झाली.  कुसूर ते तळपेवाडी हा या trail run मधला सर्वात महत्वाचा टप्पा  होता. सर्वात पुढे मी, अरुण सर, रुचेश पाखरे ,अंबरीश गुरव, यतीन सावंत व  गर्ग थेट भीमाशंकर मंदिर गाठले तेव्हा दुपारचे ४ वाजून ९ मिनटं ( १५ तास ९ मिनिट ) झाले होते. २५ ते ३० मिनिट आराम करून शिडी घाटानी खाली उतरायला सुरवात केली. खांडस गावाच्या काठेवाडी मध्ये संध्याकाळी ७ वाजून १६ मिनीटाला थडकून, अरुण सर, रुचेश, मयांक  आणि मी आम्ही चौघांनी मिळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला ( १८ तास १६ मिनिटात लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस ) 


संजयच्या टीमला भीमाशंकरला पोचायला १७ तास ३० मिनिट तर सागरची टीमला भीमाशंकरला पोचायला १९ तास १५ मिनिट लागली, या २६ जणांमध्ये फक्त विद्या डिसुझा या एकाच महिलेचा समावेश होता. याप्रकारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची हि मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली होती.







एक trail run करून थांबेल तो गिर्यारोहक कसला! पुन्हा अरुण सर आणि मी आम्ही दोघेजण trail run साठी तयार झालो. 

"सुरज, खरं तर ही माझ्या डोक्यात आलेली कल्पना, अन मीच करायचे ठरविले होते. पण आतापर्यंत मी बरेंच काही केले आहे. अगदी तृप्त आहे. तेव्हा ही संधी मी तुला देत आहे" सरांचे शब्द माझ्या कानावर आले अन मी पुरता गोंधळूनच गेलो. कुठली कल्पना? मला काहीच कळेना. सर म्हणाले "हे बघ, लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस सोलो करायचा मी ठरविले होते. पण माझ्यापेक्षा कमी वेळेचा रेकॉर्ड तू प्रस्थापित करशील याची मला खात्री आहे. तेव्हा दोन तीन दिवस धावण्याचा सराव कर. या शनिवारी फाल्गुन पौर्णिमेला, धुलिवंद आहे. तो दिवस सार्थकी लागला पाहिजे."अन मी पेटून उठलो.....सरांनी माझ्याबाबतीत जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरवायचा. मी त्यांना म्हंटले "मी आत्ताच जायला तयार आहे तुम्ही फक्त आपल्या टीमला विचारून परवानगी द्या". 

होळीच्या दिवशी दुपारी कामशेतमध्ये एक मीटिंग केली व रात्रीच जेवण लवकर करून लोणावळा रेल्वे स्टेशनला ११ वाजता पोचलो. थोडी झोप काढीन म्हंटलं पण मच्छरचा इरादा काही औरच होता. दिनांक २ मार्च २०१८ रोजी रात्री १:३० च्या अखेरीस मोबाईल खणखणला. अरुण सरांच्या भाषेमध्ये माझा मोबाइल वाजला म्हणजे मुडदा पण जागा होईल, पण मी पुन्हा झोपून जातो कारण मला त्या आवाजाची सवय झाली आहे. आजचा दिवस थोडा वेगळा होता कारण या ट्रेकला कुणी साथीदार नव्हता, तोंडावर पाणी मारून  २-३ बिस्किटे खाल्ली,अर्धा लिटर पाणी प्यायलो 


माझ्या बॅग मध्ये २ सफरचंद, २ उकडलेली अंडी, २ electrol  चे packets राहिलेला पार्लेजी आणि १ लिटर पाणी होते. २ वाजता लोणावळा रेल्वे स्टेशनच्या घड्याळाखाली फोटो काढला आणि हर हर महादेवाचं नाव घेऊन ( घोषणा देऊन ) SOLO  LOBHI ONE DAY MOUNTAIN TRAIL RUN  करायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशन ते तुंगार्ली गावापर्यंत इच्छा असूनही कुत्र्याच्या भीतीमुळे धावता आले नाही. रात्री २:३० वाजता गावच्या हद्दीत प्रवेश केला तर गावकरी होळीच्या बाजूला बसून गप्पा मारत होते त्यात एकांनी न राहून विचारले "एकटा कुठे जातोयस रं ?" मी सांगितले "भीमाशंकरला जात आहे" त्यावर त्यो म्हणाला "आरं बाबा, येवढ्या रातचा तुला रास्ता ठावं हाय का अंधाराचा ?" मी  हो हो करत दुसरा गियर टाकला. पळत पळतच वाळवंड गावामध्ये रात्री ३ वाजून ४० मिनीटाला पोहचलो तिथे माझ्या स्वागतासाठी कुत्र्याची फलटण तैनातच होती, याच्या पुढे पायवाट चालू होणार व नकळत धावण्याचा वेग कमी होणार कारण याआधी देखील एकटा या गावापर्यंत आलो होतो पण याच्या पुढे अंधारात कधीच गेलो नव्हतो. 

यापुढे मला थोडी फार भीती वाटत होती पण माझ्या सोबतिला पौर्णिमेचा चंद्र म्हणजे सुरजला चंद्राची साथ होती. सकाळी ४:३० वाजता जांभिवली गावातून येणारी व कोंडेश्वर मंदिराकडून येणाऱ्या वाटेवर पोहचलो. याच्या पुढचा टप्पा सर्वात जास्त घाबरगुंडी उडवणारा होता कारण कुसूर पठारावर जवळपास वस्ती नाहीच फक्त एकाच धनगर मामाच घर आहे ते पण एकदम कोपऱ्यात. कुसूर पठाराच्या दिशने मी आगेकूच केली बरोबर ५ वाजता कुसूर पठाराच्या सपाटीवर पोचलो. काही पक्ष्याचा किलबिलाट चालू झाला तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला.


५ :४० ला धनगरमामांना आवाज देऊन पुढे निघालो. ६ वाजेपर्यंत कुसूर गाव गाठायचा ठरवलं पण कुसुर गावात पोहचायला ६:१५ वाजले. पहिला फोन सागर अमराळेला करून सर्वांना मी कुसरमध्ये सुखरूप पोहचलो हे कळविले आणि दुसरा फोन अरुण सरांना करून मी १२ वाजेपर्यंत भीमाशंकरला पोहचणार असा अंदाज देऊन ठेवला. अंधाराच साम्राज्य संपुन प्रकाशाच्या साम्राज्याची सुरवात होणार म्हणजे खुद्द सूर्यदेवाची कृपा त्यात हा १६ किलोमीटर डांबरी रस्ता ( कुसूर ते खांडी ते सावळे ते तळपेवाडी ) म्हणजे शरीराची चांगलाच कस  काढणार फायदा फक्त एवढाच होता कि भुंगाट पळता येईल पण त्या भुंगाट पाळण्याच्या नादात कधी माझी हॅट पडली हे मला समजले देखील नाही बरं झालं मी अजून २ टोप्या घेऊन गेलो होतो    


sack मधून एक सफरचंद खात चाललो होतो. खांडीमध्ये ७ वाजता पोहचलो तेव्हा आपण विचार केलेला त्यापेक्षा थोडे मागे आहे असे सतत जाणवत होते. ७:४७ ला सावळे गाव गाठले. 

९ वाजता काही झाले तरी पढरवाडी वरून ट्रेक चालू केला तरच मी १२ वाजता भीमाशंकरला पोहचू शकतो हा माझा अंदाज होता. तळपेवाडीला ८:२१ ला पोहचून गप्प ५ मिनिट बसलो एक उकडलेलं अंड खाल्ल आणि थोडं पाणी पिऊन पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली . वांद्रे खिडीमधून संजयला फोन करून निरोप सांगितला पण पढरवाडी गाठता गाठता मला ९:३२ झाले आता शेवटचा ५ मिनिट आराम करून जेवढे पाणी घेता येईल तेवढे सर्व भरून घेतले कारण याच्या पुढे थेट भीमाशंकरलाच पाणी मिळणार हे माहित होत. 


हि तंगडतोड चालूच होती कमळजाई मंदिराच्या दिशेने चालत होतो पण उन्हामुळे डोकं एकदम तापून गेलं होत. सकाळी रस्त्यावर धावत असताना HAT कधी पडली हे समजलंच नाही त्याचा दणका मला आत्ता थोडा फार जाणवायला सुरवात झाली. १०:३० च्या आसपास खूप भूक लागली तेव्हा मी  चिक्की खाल्ली तरी पोटातले कावळे काही ऐकायचं नाव घेईना शेवटी नाइलाजामुळे पुन्हा एकदा थांबून शेवटचं उकडलेलं अंड खावं लागलं. यामध्ये माझी महत्वाची ५  मिनिट गेलीत पण पोटात काही नसेल तर पुढे जाऊन अजून काही झालं तर कोणीच नाही." precautions is better than cure "  कमळजाई मंदिराजवळ 11:38 ला पोहचलो पुन्हा एकदा संजयला फोन करून ४५ मिनिटांमध्ये मी भीमाशंकर मंदिर गाठतोय तर संजय म्हणाला "अरे लेका तू तर अर्ध्या तासातच पोचशील". मी रात्री पासून फक्त १५ मिनिट आराम केला होता त्यामुळे हे जरा शक्य वाटत नव्हते तरी मी खूप प्रयन्त केला परंतु ४८ मिनिट लागलीच.

भीमाशंकरला मंदिराचा कळस लांबूनच दिसला आणि जीवात जीव आला. १२:२६ला मी मंदिराजवळ काही फोटो काढून लिंबू पाणी पिऊन ५ मिनिट आराम केला. 





लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक तर खूप सोपा आहे पण शिडी घाट सर्वात जास्त अवघड आहे. गिर्यारोहण किंवा प्रस्तरारोहणामध्ये जे काही अपघात होतात ते जास्तीच जास्त माणूस थकल्यामुळे झालेले आहेत असं आत्तापर्यंतच्या माझ्या वाचनात आले आहे म्हणून मी १२:३६ ला निघायचा निर्णय घेतला लांबूनच महादेवाला नमस्कार करून शिडी घाटाने खाली उतरायला सुरवात केली. १३:३० वाजता गणेशघाट आणि शिडीघाटाच्या सपाटीवरती पोहचून शिडीघाटाने खाली उतरायला सुरुवात केली. शिडी घाटामधून खाली उतरण तस्स नक्कीच सोपं नाही. नजर हट्टी तो दुर्घटना घटी अशी परिस्तिथी याची पुरेपूर कल्पना होती त्या सावधगिरीनेच खाली उतरलो. जेव्हा शिड्या संपून खाली आलो तेव्हा मात्र पुन्हा धावणं चालू करून थेट गाडी पर्यंत खांडस काठीवाडीला १४:१६ ला पोहोचलो.

माझ्या विक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास मुंबई मधून अरुण सर, राजेश पाखरे, रोहन मालुसरे (भाऊ) आले होते, या सर्वाना बघुन आलेला थकवा क्षणात नाहीसा झाला. 








लोणावळा ते भीमाशंकर हे  59 किमी चे अंतर 10 तास 26 मिनिटात एकट्याने (SOLO ) पार करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला तसेच 

लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस हे ६२ किमी चे अंतर १२ तास १६ मिनिटात एकट्याने (SOLO ) पार करून गिर्यारोहण क्षेत्रात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला ....! 

Sunday, 12 April 2020

कुलंगगड प्रदक्षिणा व जटायू मंदिर १७/ १८ ऑक्टोबर २०१५


सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये सर्वांत खडतर पर्वत रांग कोणती असेल तर ती उत्तर-दक्षिण लांबलचक पसरलेली "कळसुबाई रांग". याच रांगेतील गिरायरोहकांना नेहमीच भुरळ पडणारे खडतर पण अंत्यत देखणे असे तीन किल्ले म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये हे तिने किल्ले चढायला सर्वात अवघड मानले जातात.

गेल्या ३ वर्षांपासून अलंग,मदन आणि कुलंग हे किल्ले खूप वेळा पालथी घातले होते नुकताच पावसाळा संपून ऑक्टोबर महिना चालू झाला होता. सह्याद्रीच्या प्रस्तरोहकाच आणि ऑक्टोबर महिना यांच नातं जग जाहीर आहे. कधी एकदा तो विजयदशमी साजरा करतोय आणि कधी एकदा Rock Climbing करायला बाहेर कड्या कपारीत जातोय असेे भाव प्रत्येक प्रस्तरोहकांचे असतात. यावर्षी देखील विजयादशमी नेहमी प्रमाणे SGNP SLAB मध्ये जाऊन साजरा करायचा विचार होता. काही दिवस आधी अरुण सरांनी विचारले मग काय विचार विजयादशमीचा? मी पूरता गांगरुन गेलो. दरवर्षीं जिकडे जातो तिकडे जाऊया. मी सरांना आतुरतेने विचारले तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय? तसे सर म्हणाले "दसऱ्याच्या नंतर जे काही करणार त्याची पाहणी करूया म्हणजे दसरा सार्थकी लागेल", "बस्स अब तो काम हो गया" बोला सर कुठे जाऊया, दोघे असलो तरी चालेल पण आता माघार नाही. सुरज तू फक्त आंबेवाडी मधून भोरूला आपल्या बरोबर घेयाचे आहे हे विसरू नकोस.

अरुण सर मी सोहन बरोबर बोललो आहे तो पण येण्यासाठी तयार झाला आहे. आम्ही शुक्रवारी रात्री १६ ऑक्टोबर २०१५ आंबेवाडीला पोहचून भोरूच्या घरी निद्रावस्थेत गेलो पण उत्सुकता एवढी होती कि मला काही झोप लागेना . इथला संपूर्ण भाग सरांनी पिंजून काढला आहे मग बाकी काय ! त्यात सरांना विचारायची हिम्मत तर मुळीच नाही. गप्प गुमान पुटपुटलो "झोपातो नाहीतर मलाच सोडून जातील"

सकाळी सरांनी शिट्टी वाजवली. माझ्या मोबाईलच्या गजराच्या आवाजावर सर उठले पण मी तसाच झोपलो होतो. मग सर काय सोडणार होय पुढच्या १० मिनटात शिटी वाजवून उठवले. पण तरी मला जास्त झोपायला दयायचे कदाचित मी त्यांचा लाडका विद्याथी होतो.  😀😃 

मी उठलो आणि डोक्यात विचार आला सर बाहेर जाऊन नजर कुठे फिरवणार का?  ते पहायला गेलो पण कदाचित सरांनी त्यांचे काम आधीच करून घेतले असेल, शेवटी न राहून मी विचारलं,
पण सरांचं उत्तर आलं "तू झोपा काढ जा" 😑

सर्व तयारी करून आम्ही चौघे जण सज्ज झालो. जास्तीचे पाणी आणि जेवण घेऊन गावातून निघून नेहमीच्या झापा जवळ गाडी लावली. आम्ही चौघे जण चालायला तसे तरबेज होते म्हणून जरा भरभर चालत होतो चालता चालता आमची वाट हळूच कुलंगच्या दिशने वळली. जवळजवळ अर्धा टप्पा झाल्यावर आम्ही विश्रांती घेतली. तेवढ्यात भोरू उठून डाव्या घळीत शिरला तर मी लगेच त्याला विचारला "कुठली वाट शोधतो आहेस? 

अखेरीस सरांनी बॉब फोडला, आपण कुलंग प्रदक्षिणा मारून छोट्या कुलंगचा शोध घेणार आहोत.
कारण आजतागायत तिकडे कोणी गिर्यारोहक फिरकला नाही. हे ऐकून मी तर भलताच खुश झालो पण डोक्याला थोडेसे पटत नव्हते कारण सर तर दसऱ्याचा नंतरची म्हणजे rock climbing ची पाहणी करायची आहे असं बोलले होते पण हा तर ट्रेकच असणार. शेवटी भोरू ने वरुन आवाज दिला " वरती या, फक्त घळीच्या तोंडावरती थोडी काटेरी झाडाची जाळी आहेत सर्वांनी वाकून या"


आम्ही घळ चढून वरती जातो तर काय मदन आणि कुलंगच्या वाटेवरती पोचलो अगदी नेहमीच्या कातळा जवळ (जिथे कुलंगचा कातळ चालू होतो ). खिंडीमध्ये डायरेक्ट short cut ने आम्ही पोहोचलो होतो. हा ट्रॅव्हर्स म्हणजे फक्त कारवी आणि काटेरी झाडे. त्या काटेरी झाडांनी आम्हाला मदन ते  कुलंगचा ट्रॅव्हर्स करताना जे काही फोडून काढलं आहे बस्स रे बस्स मला तर त्याची खूप धास्ती वाटायची . हळू हळू चालत आत्ता कुलंगच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो आणि तिकडे भयकंर घसारा (Scree) चालू झाला. पण ऑक्टोबर महिना असल्यामुळे मातीमध्ये ओलावा बाकी होता. आमच्या कडे Harness, Rope इत्यादी सर्व साहित्य होते पण त्याची एवढी  काही  गरज भासली नाही. तिकडून दिसणारा अलंग,मदन आणि कुलंग काही तरी वेगळेच दिसत होत. आम्ही टोकाला होतो तिथे पहिले मानवी पाऊल कदचित आमचेच असेल. दुपारचे १ किंवा २ वाजले असतील त्याच टोकवरती बसून मस्त जेवण करून घेतलं. ज्या घसारावरतून (Scree) आलो त्याच वाटेवरून मागे जाऊन दुसऱ्या बाजूला जाण्याची सोपी वाट तिथेच दिसत होती बाकी सर्व ठिकाणी कातळ आणि भयंकर खोल दरी होती. एका ठिकाणी २० फूट scree चा patch लागला. तिकडे वरती चढून आडवं चालत गेलो कि आम्ही कुलंगच्या कातळाला लागलो . ज्या दुसऱ्या बाजूला जाणार होतो तिकडचा  traverse हा थोडा मोकळाच होता त्याच कारणही तसंच होतं सह्याद्री मधला बेफाट पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिथे कारवीला देखील तग धरून राहणे देखील अवघड होते.

इतिहास याच मातीत घडला आहे म्हणून या सह्याद्रीची सैर करणे कुणा येड्या गाभाळ्याचे काम नाही या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात." पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे". हि म्हण एवढी चपखल बसते कि बस्स रे बस्स वाघ म्हणजे खुद्द अरुण सावंत सर, साथीला सह्याद्रीतील वारा तर होताच आणि आम्ही बाकीचे मराठे. 

पायखालची वाट मोकळी असल्यामुळे समोरच असेलेला छोटा कुलंग राहून राहून त्याच्या प्रेमात पाडत होता पण बोलतात ना "नजर  हटी और दुर्घटना घटी "  शेवटी काय धडपडलो. जसं जसं पुढे जात होतो तस तसे  कुलंग आणि छोटा कुलंग मध्ये काही तरी भानगड दिसत होती. उजव्या अंगाला सुळक्यासारखा काही तरी  दिसत होत थोड्याच वेळात एक कपार लागली रात्रीच्या मुक्कामासाठी खूप चांगली जागा होती. सरांना ती कपार दाखवली पण भोरू काही ऐकायलाच तयार नव्हता, आम्हाला फक्त रात्रीचा मुक्काम करून सकाळी सरळ कुलंगच्या नेहमीच्या वाटेने खाली उतरायचे होते, पण ऐकेल तो भोरू कसला. खिंडीमध्ये एक Lose Bolder Pinnacle आणि छोटा कुलंगची रॉक वॉल दिसली. जाता जाता कुलंगच्या समोरच्या बाजूचे फोटो काढून घेतले होते.


अरुण सरांना छोट्या कुलंग बदल जास्त काही माहित नव्हते म्हणून त्या वेळेला आम्ही ठरवलं, जर का कुलंगला पायवाट नसेल तर खिंडीमधली रॉक वॉल climb  करायची पण जर पायवाट असेल तर माथा गाठायचा एवढ नक्की . थोड्या वेळात अंधार पडायला सुरवात होणार होती. जेवढे जमेल तेवढे  पुढच्या अंगाला जाऊन राहूया, शेवटी आम्ही सर्व traverse ने पुढे येऊन अडचणींमध्ये मुक्कामासाठी थांबलो  . कदाचित चांगल्या ठिकाणी झोपलो असतो तर तो दिवस आणि जागा कधीच विसरून गेलो असतो. रात्रीचा मुक्काम म्हंटल कि अरुण सरांचा बेत काही वेगळाच असायचा त्यांना खिचडी भात ट्रेकला खायाला कधीच आवडायचे नाही पण मला मात्र सरांच्या हातची खिचडी खूप आवडायची. त्यादिवशी सरांनी सुक्या बोंबलाच कोरड्यास, भात आणि सकाळची कोरभर भाकरी करून खायला घातली त्यामुळे मन अगदी तृप्त होऊन गेलं.


रात्री गप्पा मारत मारत आम्ही सर्व कधी झोपून गेलो ते समजलंच नाही. सकाळी ८ वाजता आम्ही मुक्कामी जागेवरून चालायला सुरवात केली आणि अवघ्या १ तासामध्ये आम्ही कुलंगच्या नेहेमीच्या वाटेला जाऊन थडकलो आणि आम्ही सर्वानी एकच जल्लोष करून खाली उतरायला लागलो. चालता चालता राहिलेला वेळ कसा सार्थकी लावायचा ? या चर्चेला उधाण आलं.  

महाराष्ट्रतील नाशिकात रामायण घडलं असं बोलल जात म्हणून जवळपास असेलेला महाराष्टातील जटायुच मंदिर बघून जाऊया. गावात पोहोचायला पुढचे २ तास पुरेसे होते. रस्त्यावर लागलो तेव्हा एक कुरंगवाडी मधला एक मुलगा भेटला तेव्हा मी छोट्या कुलंग विषयी माहिती काढली पण त्याने छोटा कुलंगवर जाण्यास नकार दिला "तुम्हा लोकांना नाय जमायचं तिकडं वाट अडचणीची आहे ". अरुण सरांच्या मते तो मुलगा जर का एवढा बेधडक बोलतोय याचा अर्थ तो जाऊन आला आहे. पण त्याला काय माहित आपण कोण आहे. त्यामुळे साहजिकच तो हे उत्तर देणारगावात पोचल्यावर लगेच सोहम आणि मी जवळच्या तलावामध्ये डुबक्या मारून मज्जा केली कारण आमच्या ट्रेकमध्ये असे क्षण खूप कमी मिळतात. मस्त अंघोळ करून भोरूच्या घरी जेवणाचा बेत करून निघालो. 


दुपारी ३च्या सुमारास आम्ही जटायू मंदिरच्या जवळपास असलेल्या झाडावरती एकदम मोठ्या आकाराचे वटवाघूळ पहिले ते थोडे जास्तच भयानक दिसत होते.
जटायु पक्षांच भला मोठा पुतळा समोरच दिसत होता. मंदिरांमधली जटायू आणि रामची मूर्ती देखील खूपच बोलकी आहे

,जटायू रामच्या कुशीमध्ये पडलेला दिसत होता. ते सर्व पहिल्या नंतर नकळत जटायूचे रामावरील  प्रेम आणि श्रद्धा याची जाणीव आपल्याला होते.

नेहमी प्रमाणे संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये ९ च्या सुमारास सगळे सुखरूप पोहोचलो. पुढच्या काही दिवसात अरुण सर आणि आशिष म्हात्रे यांच्या मध्ये छोटा कुलंग विषयी जाण्याची चर्चा देखील झाली पण अरुण सरांना वेळेअभावी जमले नाही. थोड्या दिवसांनी Chakram hikers team ने छोटा कुलंग आणि खिंडी मधला pinnacle ची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांची facebook लिंक येथे देत आहे. 


https://www.facebook.com/vinay.y.jadhav/media_set?set=a.10209764874303678&type=3

=========================================================
सुरज मालुसरे
९२२१८३१३६४