अलंग, कुलंग, मदन अवघ्या साडे नऊ तासात…।!
सह्याद्रीच्या सर्व पर्वत रांगामध्ये सर्वांत खडतर पर्वत रांग कोणती असेल तर ती उत्तर-दक्षिण लांबलचक पसरलेली “कळसूबाई रांग”. याच रांगेतील गिर्यारोहकांना नेहमीच भुरळ पाडणारे खडतर पण अत्यंत देखणे असे तीन किल्ले म्हणजे अलंगगड, मदनगड व कुलंगगड. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये हे तीन किल्ले चढायला सर्वांत अवघड मानले जातात. हे तीन किल्ले केले कि गिर्यारोहक Matured झाला असे समजले जाते.
मी जेव्हा ट्रेकिंग चालू केले तेव्हा पासून ह्या तीन किल्ल्यांचे वर्णन अनेकांच्या तोंडून ऐकत होतो. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. अखेर २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या एका ग्रुप बरोबर अलंग व मदनला जावून आलो. त्याच वेळी प्रसिद्ध गिर्यारोहक श्री अरुण सावंत हेही हे किल्ले करावयास आले आहेत हे कळले, पण दुर्देवाने अरुण सरांची भेट काही झाली नाही.
या ट्रेक वरून परत आल्यानंतर अरुण सरांशी मी फेसबुक वरून संपर्क साधला व त्यांचेबरोबर गिर्यारोहण करण्याची इच्छा प्रगट केली. त्यांनी मला २४-२५ मार्चला आयोजित केलेल्या मदन वरून कुलंगगडाकडे वरच्या वर जाणाऱ्या Short-cut trek ची माहिती दिली. ज्या माणसाने गेली ४० वर्ष सह्याद्री नुसता पिंजून काढाला आहे, अनेक मोहिमा व कॅम्प ज्यांचे नावावर आहेत, बलाढ्य कोकण कड्यावरू उतरणारा पहिला मानव म्हणून जे परिचित आहेत अशा व्यक्तीबरोबर मला गिर्यारोहण करावयास मिळणार याचा मला खुप आनंद झाला. या ट्रेकमध्ये अरुण सरांशी माझी चांगलीच जवळीक झाली. अरुण सरांनी शोध लावलेल्या या short-cut मुळे मदनगड ते कुलंगगड हे अंतर तब्बल ६ ते ७ तासाने कमी झाले होते.
साधारण महिन्याभरात मला अरुण सरांचा फोन आला. 'अलंग, कुलंग, मदन हे तीन किल्ले करायला गिर्यारोहकांना साधारण तीन दिवस लागतात. हे किल्ले एका दिवसात करायचे माझे गेली २२ वर्षांचे स्वप्न आहे. पण कोणी तेवढ्या ताकदीचे गिर्यारोहक मला अजून पर्यंत भेटलेच नाहीत. आता मला सिद्धार्थ वराडकर नावाचा एक रांगडा शिलेदार भेटला आहे, त्याने नुकतीच श्रीलंकेतील Half Iron man शर्यत पूर्ण केली. तुही सक्षम आहेस असे मला वाटते. पण तुला प्रचंड मेहेनत घ्यावी लागेल. दररोज ८ ते १० कि मी धावण्याचा सराव करावा लागेल. शिवाय ऐन मे महिन्यातच रखरखीत उन्हात मला ही मोहीम यशस्वी करायची आहे. तुझे काय ते दोन दिवसात मला कळव.'.
सर मी १००% येतोय … आजपासून आरे कॉलनीत धावण्याचा सराव सुरूही केला. तुमच्या माझ्यावरील विश्वासाला मी तडा जावू देणार नाही'. दुसऱ्या दिवशीच मी सरांना फोन करून कळविले .…. ऐसा मोका बार बार नही मिलता.......!
सुपारी फुटली अन मोहिमेची तारीख ठरली .
GPS चे मार्किंग करायची जबाबदारी सिद्धार्थने उचलली होती. प्रत्येकाकडे दीड लिटर पाणी व प्रस्तरारोहणाचे साहित्य होते. अमेरिकेत काही वर्षे राहिल्यामुळे अन लांब पल्ल्याच्या धावण्याच्या तसेच सायकल शर्यतीत नियमित भाग घेत असल्यामुळे अशा प्रकारच्या शर्यतीत खेळाडूचा कोणता आहार असावा याचा सिद्धार्थ तज्ञ होता. त्याचे सांगण्यानुसार आम्ही पोळी-भाजीबरोबर हापूस आंबे, द्राक्ष, गाजर, संत्री, काकडी यांना जास्त प्राधान्य दिले होते. अशा फळांनी तहानही भागते अन भूकही लागत नाही. ट्रेकचा पहिला टप्पाच अवघड होता. उभार चढावामुळे अलंग व मदनच्या बेचक्यात पोहोचायलाच इतर गिर्यारोहकांना अडीच ते तीन तास लागतात. पण आम्ही अवघ्या ४५ मिनिटातच या कोल मध्ये धावून थडकलो. ६:३० वाजता खिंडीत पहिला पाय मी रोवला अन बरोबर एका मिनिटातच अरुणसर व सिद्धार्थ येऊन पोहोचले.
मला वाटले की आता थोडी विश्रांती घेऊया. पण अरुण सरांचा करडा आवाज कानावर पडला 'चला चला … आता शेवटपर्यंत अजिबात थांबायचे नाही.
घोटभर पाणी पिऊन आम्ही अलंगच्या कातळाकडे झेपावलो. आता ४५ फुटांची सरळसोट कातळ भिंत चढायची होती. सरांनी प्रत्येकाला एकेक हापूस आंबा कापून दिला. अशा वेळी अख्खा हापूस आंबा खाण्याची गोडी काही औरच होती.................
आम्ही अलंग गडावर जाऊन परत येईपर्यंत भोरु आमची वाट पाहत इथेच थांबणार होता. समोरची ४५ फुटांची कातळ भिंत चढायची जबाबदारी माझी होती. स्वातंत्र्य पूर्व काळात या अभेद्य किल्यांवर स्वातंत्र्य सैनिक आश्रय घ्यायचे. म्हणून ब्रिटिशांनी सुरुंग लावून या किल्ल्यांच्या पायऱ्या फोडून टाकल्या होत्या. पण आमच्यासारखी माकडे प्रस्तरारोहणाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे थोड्याशा आधारावरही या कातळ भिंतीं सहज चढून जातात. मी लगेच सीट हार्नेस चढवली. ७:०८ ला मी चढाईला सुरुवात केली अन ७:२२ ला वर देखील पोहोचलो.
'मस्त मस्त, खूप छान climbing केलेस' सरांच्या शब्बासाकीने शरीरावर मुठभर मांस चढले. काय माहित त्यांनी अशी कोणती गोष्ट माझ्यामध्ये बघितली होती की माझ्यासारख्या नवोदिताला एवढ्या मोठ्या मोहिमेत सामील करून घेतले ..!
मी वरून बिले दिला व अरुण सरांनी तो कातळ स्वत:च्या ताकदीने सर केला. त्यांच्या मागोमाग सिद्धार्थनही चढून आला. 'तुम्हा कोणालाही दोराने खेचणार नाही. प्रस्तरारोहण करीतच अलंग व मदनची भिंत चढायची आहे हे लक्षात ठेवा'. हे अरुण सरांनी आम्हाला मुंबईलाच स्पष्ट केले होते. तिथे दोर तसाच ठेवून आम्ही ७:४२ ला अलंगच्या निसरड्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. बरोबर ७:५३ वाजता अलंगच्या गुहेजवळ पोचलो. घोटभर पाणी ढोसले अन अलंगच्या सर्वात उंच शिखराकडे कूच केले. बरोबर ८:०९ वाजता आम्ही अलंगच्या समिट वर पोहोचलो.
त्या क्षणी आम्हाला काय आनंद झाला म्हणून सांगू अवघ्या सव्वा दोन तासात आम्ही अलंग गड काबीज केला … जय भवानी जय शिवाजी च्या आरोळ्यांनी सारा आसमंत दुमदुमून गेला. सिद्धार्थने आपल्या GPS मध्ये त्या ठिकाणच्या अक्षांश व रेखांशाचे marking केले अन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.
वाटेत असलेल्या अजस्त्र टाक्यांमधले मधुर पाणी भरून घेतले. शेजारील खडकांवर बसून थोडेसे खावून घेतले.
काही वेळेतच अलंगच्या गुहेजवळ पोहोचलो. आत्तापर्यंत अलंगवर येऊन मुक्काम केला नाही असे झाले नव्हते. त्यामुळे काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. अखेर गुहेला बाय-बाय करून पुढे निघालो. Rappelling करून खाली उतरलो. खिंडीमध्ये भोरू आमची वाट पाहत बसला होता. त्यावेळी सकाळचे ९:२५ झाले होते.
समोरच मदनचा कातळ लक्ष्य वेधून घेत होता. इतर किल्ल्यांच्या मानाने मदन लांबून तसा फार छोटा दिसतो. पण त्याच्या उभार पायऱ्या अन traverse चांगलीच दमछाक करतो. साधारण २५% चढाई झाल्यावर ९:३४ वाजता आम्ही तुटलेल्या पायर्यांपाशी पोहोचलो.
तो ३० फुटांचा कातळ-कडा चढणे क्रमप्राप्त होते. या वेळी अरुण सर पुढे सरसावले. त्यांचा प्रस्तरारोहणाचा वेग मात्र भयानक असतो. अवघ्या दीड मिनिटात ते वर पोहोचले अन आम्हाला वर येण्याचा त्यांनी इशारा दिला.
मदनाच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा सकाळचे १०:२० वाजले होते.
चला दुसरा किल्ला काबीज केला. जय भवानी जय शिवाजी च्या आरोळ्यांनी परत एकदा सारा आसमंत दुमदुमून गेला. डोक्यावरील उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले होते. 'आता यापुढे आपली चांगलीच दमछाक होणार आहे. खरा कस लागणार आहे. चाल हळू झाली तरी चालेल पण वाटेत कुठेही विश्रांती साठी म्हणून थांबायचे नाही' अरुण सरांनी सक्त ताकीद दिली आणि माझ्या पोटात गोळा आला. आलिया भोगाशी ....!
मदनच्या गुहेत फलाहार केला अन उतरायला सुरुवात केली.
खिंडीतून मदन गडाला उजव्या अंगाला ठेवून त्याच उंचीने वळसा घालीत घालीत (traverse) अरुण सरांनी तीन महिन्यांपूर्वी शोध लावलेल्या या जवळच्या (short-cut) वाटेने आम्ही निघालो. या चिंचोळ्या वाटेने जाताना सर आम्हाला काही ऐकत नव्हते. आमच्या बरेच पुढे ते निघून गेले होते अन शिट्या वाजवीत आम्हाला बोलावीत होते. मे महिन्याच्या प्रखर उन्हामुळे आमचे चांगलेच हाल झाले होते. वाटेतील ३ सुळक्याना वळसा घालून कुलंगगडाच्या कड्यापाशी ११:५२ ला पोहोचलो. तिथून कुलंग गडाला वळसा घालून मुख्य पायर्यांपाशी पोहोचायला १२:१९ वाजले. म्हणजे अवघ्या एका तासातच आम्ही हा traverse पूर्ण केला.
'इथून अवघ्या अर्ध्या तासातच आपण माथ्यावर पोहोचू' अरुण सरांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली. मग काय, मोठ्या आवेशात झपाटल्यासारखा मी पुढे निघालो.
१२:४५ ला मी कुलंग गडाच्या गुहेत थडकलो. मागून दोघेही येऊन मला मिळाले. बापरे… आम्हाला खूप आनंद झाला होता. अवघ्या सात तासात आम्ही तीन किल्ल्यांवर पाय ठेवले. विशेष म्हणजे या सात तासात आम्ही कुठेही विश्रांती घेतली नव्हती. लगेच आम्ही गडाचे उत्तुंग शिखर गाठले. 'आता आपण इथे मस्त सेलिब्रेट करूया. आधी आंघोळ व नंतर जेवण. आता मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही' अरुणसर प्रथमच एवढे गोड बोलत होते.
रणरणत्या उन्हात कुरंग गडाच्या गार पाण्याने आंघोळ करायचे सुख काय असते ते शब्दात सांगणे अवघड आहे. आतापर्यंत झालेली दमछाक क्षणार्धात नाहीशी झाली. पोळी भाजी, उकडलेली अंडी, त्यानंतर अख्खा अख्खा हापूस आंबा खावून आम्ही चांगलेच ताजे तवाने झालो.
१:३९ वाजता कुरंग गड उतरायला सुरुवात केली. २:४१ वाजता पायथ्याशी असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचलो.
३:१९ ला परत संपत ठवळेच्या झापापाशी येवून थडकलो आणि मी शेवटचा श्वास सोडला.
खरं तर माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. एवढे बलाढ्य किल्ले, ज्यांचा गिर्यारोहण वर्तुळात दबदबा आहे ते आम्ही अवघ्या ९ तास ३४ मिनिटात पूर्ण केले हे खरेच वाटत नव्हते. अरुण सरांनी सकाळी निघतेवेळी सांगितलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला. कमाल आहे या माणसाची…...!
“तुम्ही जे खाता तसेच तुम्ही असता”, मी त्याच म्हणीच एक वेगळ रूप वापरतो, “तुम्ही जे शिकता तसेच तुम्ही असता”. याचा अर्थ असा कि तुम्ही जे शिकता ते एकलव्यासारखे तन्मयतेने शिका. मग बघा यश तुमच्या समोर उभे असेल. सोचना दुनिया का सबसे मुश्कील काम है. इसलिये बहुत कम लोग यह काम करते है.
मोहिमेतील सदस्य- अरुण सावंत सर (मोहीम प्रमुख), सिद्धार्थ वराडकर, सुरज मालुसरे.


















वाह...!
ReplyDeleteवाह....!!
वाह......!!!
खडतर ट्रेक कमी वेळात पुर्ण,सुपर्ब ��,
अप्रतिम फोटोग्राफी ��,
खरं आणि उत्तम वर्णन,��
सह्याद्री पिंजून काढलेले चांगले कणखर गुरू सोबत असणे भाग्यवान ��
तगडा अनुभवी साथीदार उत्तम निवड�� शाब्बास ��,
आपण जे शिकतो तेच बनतो हे मात्र तंतोतंत खरे��
बेस्ट गुरू सोबत त्यांची शाब्बासकीची थाप हा कौतुकास्पद हेवा वाटणारा प्रसंग आणि तो सगळ्यात आवडता हापूस आंबा���� ट्रेक दरम्यान हापसायला ��मिळणे हा महाहेवा वाटणारा प्रसंग,
खूप कौतुक तुमचे, आवडणार्या ह्याहून कठीण उत्तमोत्तम ट्रेक सफारीच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ��....
Thanks Madam 🙏😀
ReplyDeleteया लेखामधून अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. डोंगरात येण्याचं वेड या ट्रेक मुळेच मिळालं, विशेष म्हणजे अलंग,मदन,कुलंग लाच तुम्ही सर्व मित्र आणि सर पण भेटले ते कायमचेच.��
ReplyDeleteThanks Mitra
DeleteMast
ReplyDeleteThanks
Deleteकमाल कमाल कमाल आहे तुमची .....
ReplyDeleteThanks
Deleteसूरज गिर्यारोहणात अशक्यप्राय स्वप्न बघणे आणि ती सत्यात उतरवणे ही असाधारण कला अरुणसरांकडे होतीच तीच कला तुझ्या कडे आहे.फक्त आता जबाबदारी वाढली आहे.मस्त भटकंती व्हावी या शुभेच्छा!💐💐
ReplyDeleteThanks
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमस्त! मी आणि माझे २४ मित्र-मैत्रीणी, आम्ही नवोदीत ट्रेकर्सचा ग्रुप अरूण सरांनी ट्रॅव्हर्स शोधल्याच्या पुढच्याच मे महिन्यात इथून जायचा प्रयत्न करत होतो, कमाल एक्सपोझर आहे! अंदाज आल्यामुळे परत फिरलो होतो, आणि नेमका कुरंगचा रस्ता चुकलो! मग कसेबसे एका मिळालेल्या नळीच्या वाटेने कुरंगवाडीत उतरलो, पाण्याची वा न वा! एवढा मोठा पल्ला आणि तो खतरनाक ट्रॅव्हर्स इतक्या कमी वेळात! कमाल आहे तुमची आणि तुमच्या साहसाची!
ReplyDelete- स्पृहा